उमर अकमलची सीनियर्सना धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर माझ्यावर आरोप करणे बंद नाही केले तर मी माझेही तोंड उघडेन. माझ्याकडे त्यांची अनेक अशी खासगी पराक्रमे आहेत जे मी सर्वांसमोर आणले तर त्यांचे कुटुंबीयसुद्धा दुखी होतील, असा धमकीवजा इशारा पाकिस्तानच्या यष्टिरक्षक फलंदाज उमर अकमलने आपल्या सीनियर्स खेळाडूंना दिला आहे.

पाकिस्तानसाठी धडाकेबाज खेळ करणारा उमर अकमल आपल्या वारंवारच्या वादांमुळे संघाबाहेर फेकला गेला आहे. नेहमी वादाला कवठाळून बसणार्या अकमलला त्याचे सहकारी त्याच्या खराब वर्तणूक आणि अपरिपक्वतेसाठी जबाबदार धरतात. सीनियर्स सहकार्यांच्या या आरोपांमुळे उमर खूपच चिडला आहे आणि त्याने आपल्या सीनियर्सलाच धमकावले की माझ्यावर तोंड उघडायची वेळ आणू नका. त्यांनी आपापली तोंड बंद नाही केली तर त्यांना तोंड लपवून फिरावे लागेल, अशा त्यांच्या गुप्तगोष्टी चव्हाटयावर येतील, असे तो म्हणाला.

माझ्याबरोबर खेळलेले माझे सीनियर्स मला अपरिपक्व म्हणतात. ते सीनियर्स असल्यामुळे मी त्यांचा आदर करतो, पण मी त्यांना एवढेच सांगेन, त्यांच्या गुप्तगोष्टी मला बाहेर काढण्यासाठी भाग पाडू नका. माझ्याकडे अशा अनेक रहस्य आहेत, जे जर मी सांगितले तर त्यांच्या कुटुंबियांना फार वेदना होतील. एवढेच नव्हे तर आपले सामान्य क्रिकेटप्रेमी क्रिकेट पाहणे सोडून देतील, असेही अकमल म्हणाला.