भाजप व आरएसएसच्या विचारसरणीचा हिंदुस्थानला , सर्वात मोठा धोका आहे. भाजप व संघाची विचारसरणी केवळ मुस्लिमांनाच नव्हे, तर शिख, ख्रिश्चन आणि अनुसूचित जातींनाही निशाणा बनवते. ते या धर्माच्या लोकांना समान दर्जा देत नाहीत, असे आणखी एक खळबळजनक विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. तसेच संपूर्ण जगभरात मी कश्मिरींचा ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ असल्याचे वक्तव्य करीत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पाकव्याप्त कश्मीरच्या बाघ परिसरातील निवडणुकीच्या सभेत बोलताना इम्रान यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारसरणीवर हल्ला चढवला. सलग दोन दिवसांत त्यांनी दोनदा आरएसएसविरोधात विधाने करून खळबळ उडवली आहे. याआधी 16 जुलैला उझबेकिस्तानमध्ये मध्य दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेत पोहचताना त्यांनी खळबळजनक विधान केले होते. हिंदुस्थान-पाकिस्तानच्या संबंधात आरएसएसची विचारसरणी आड येत असल्याचे ते म्हणाले होते. तसेच कश्मीरातील कलम 370 हटवण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्लाबोल सुरू ठेवला आहे. 5 ऑगस्ट 2019 नंतर कश्मीरात अत्याचार वाढले आहेत. मी प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मिरींचा ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ आहे. कश्मिरींच्या संघर्षामध्ये नेहमीच त्यांच्यासोबत उभा राहीन, अशा शब्दांत इम्रान यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.



























































