खासदार आमिर लियाकत यांचा संशयास्पद मृत्यू; तीन लग्न, घटस्फोट अन् न्यूड व्हिडीओमुळे होते चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार आणि लोकप्रिय टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसैन (Amir Liaqat Hussain) यांचा मृत्यू झाला आहे. कराची येथील राहत्या घरामध्ये संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनी ‘जियो टीव्ही’ने लियाकत यांच्या नोकराच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

आमिर लियाकत हुसैन यांचा मृत्यू कार्डियक अरेस्टने झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 1972 मध्ये कराचीमध्ये जन्मलेल्या आमिर यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची तीन लग्ने झाली होती.

2022 मध्ये त्यांनी दानिया शाह नावाच्या तरुणीशी लग्न केले होते. ती त्यांच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान होती. मात्र लग्नानंतर काही महिन्यात तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या दरम्यान आमिर यांचा एक बेडरूममधील न्यूड व्हिडीओही व्हायरल झाला होता. दानिया हिनेच हा व्हिडीओ लिक केल्याचा आरोप आमिर यांनी केला होता. तसेच त्यांनी आपण देश सोडणार असल्याचीही घोषणा केली होती.

बुधवारी रात्रीपासून आमिर लियाकत हुसैन यांची तब्येत बिघडल्याचे त्यांच्या नोकराने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले. तब्येत बिघडल्यानंतरही त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. यादरम्यान ते वेदनेने किंचाळत असल्याने नोकराने त्यांच्या रुमकडे धाव घेतली. रुम आतून बंद असल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी त्यांची हालचाल मंदावली होती. यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

आमिर लियाकत हुसैन यांनी मार्च 2018 मध्ये इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षामध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी ते मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पक्षाचे बडे नेते होते. मात्र 2016 मध्ये त्यांनी एमक्यूएम पक्ष सोडला आणि राजकारण सोडल्याची घोषणा केली. मात्र त्यांनी पीटीआयमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते कराची येथून खासदार म्हणून निवडून आले. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी पीटीआय पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता.