इस्रायली हल्ल्यात 15 हजार पॅलेस्टिनी ठार, मृतांमध्ये 70 टक्के महिला आणि मुलांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम संपताच आयडीएफने नव्याने जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांची संख्या 15 हजार 200 हून जास्त झाली असून यात 70 टक्के महिला आणि मुलींचा समावेश आहे, अशी माहिती हमासद्वारा संचालित आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. इस्रायली आणि हमास यांच्यातील युद्धामुळे निष्पाप लोकांचे बळी जात असून हजारो लोक बेघर झाले आहेत.

इस्रायलने शनिवारी दक्षिण गाझाच्या खान युनीस परिसरात जोरदार हल्ले केले. हमासच्या पन्नासहून जास्त ठिकाणांवर हवाई, टँक फायर आणि नौदलाचे हल्ले केले. शुक्रवारी रात्रभर मोठे हल्ले केल्याने या हल्ल्यात शेकडो नागरिक ठार झाले आहेत. मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ अल-किदरा यांनी शनिवारी या आकडय़ांची घोषणा केली, परंतु त्यांनी यासंबंधी सविस्तर माहिती देणे टाळले. आरोग्य मंत्रालयाकडून मागील वेळी मृतांचा आकडा 13 हजार 300 हून जास्त सांगितला होता, परंतु अधिक वाढलेल्या संख्येसंबंधी त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. 15 हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला असून 40 हजारांहून जास्त लोक जखमी झाले आहेत, असे अल किदरा यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी दुबईत खाडीतील देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक केली. हे (इस्रायल-हमास युद्ध) पुढे चालून वेगळय़ाच वळणावर जात आहे. त्यामुळे यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर ब्लिंकन यांनी पश्चिम आशियाचा केलेला हा तिसरा दौरा आहे.

137 इस्रायली ओलीस

इस्रायलमधील 137 जण हमासकडे ओलीस आहेत. यात 115 पुरुष, 20 महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. हे अजूनही बंदिस्त आहेत. इस्रायलकडून मोठय़ा प्रमाणात झालेल्या बॉम्बहल्ला आणि अन्य हल्ल्यामुळे गाझाच्या 2.3 दशलक्ष रहिवाशांपैकी तीन चतुर्थांश नागरिक बेघर झाले आहेत. त्यामुळे गाझापट्टीत अन्न, पाणी आणि अन्य आवश्यक पुरवठय़ाची टंचाई निर्माण झाली आहे.