आरक्षणधारकांसाठी 12 सप्टेंबरपासून चार विशेष रेल्वे, पंचवटी एक्सप्रेसचाही समावेश

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 12 सप्टेंबरपासून चार अतिरिक्त विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात दररोज धावणाऱया मुंबई-मनमाड पंचवटी विशेष रेल्वेचाही समावेश आहे. फक्त आरक्षणधारकच या रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत. या चार विशेष रेल्वेपैकी मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस व बेंगलोर-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस दररोज धावणार आहेत.

सतरा द्वितीय आसनश्रेणी व तीन वातानुकुलित चेअर कार असणारी गाडी क्रमांक 02110 मनमाड मुंबई विशेष गाडी दररोज सकाळी 6.02 वाजता मनमाड येथून निघून पावणेअकरा वाजता मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली व इगतपुरी येथे थांबा आहे.  गाडी क्रमांक 02109 डाऊन मुंबई मनमाड संध्याकाळी सवासहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघून मनमाडला रात्री 10.50 ला पोहोचेल.

गाडी क्रमांक 02627 डाऊन बेंगलोर-नवी दिल्ली दररोज संध्याकाळी सवासात वाजता निघून तिसऱया दिवशी सकाळी सवा दहाला नवी दिल्लीत पोहोचेल. या गाडीला मनमाड, जळगाव, भुसावळ, बुहाणपूर, खंडवा येथे थांबे आहेत. तर नवी दिल्लीहून रात्री सवानऊला निघणारी विशेष रेल्वे तिसऱया दिवशी दुपारी दीडला बेंगलोर स्थानकात पोहोचणार आहे.

त्याचबरोबर बलसाड – मुजफ्फरपुर श्रमिक विशेष रेल्वे, अहमदाबाद-पुरी रेल्वे आरक्षणधारकांसाठी सोडल्या जातील. या सर्व विशेष गाडयांमध्ये प्रवाशांना कोरोनासंदर्भातील सर्व नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे.

प्रवाशांनी बोर्डिंग,प्रवासादरम्यान आणि स्थानकावर उतरल्यानंतरही मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग आदी नियमाचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या