लातूर मनपाच्या वतीने कागदी पिशवी कार्यशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहर महानगरपालिकाअंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत व लोककल्याण, अलविया प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काळाची गरज ओळखून व रोजगाराच्या संधीचा वापर करुन बचत गटातील महिलांकरिता कागदी पिशवी बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ९० महिलांनी सहभाग नोंदविला.

शासनाच्या वतीने प्लास्टिक बंदी केली त्याच्या अनुषंगाने काळाची गरज ओळखून लातूर मनपाच्या वतीने पुढाकार घेऊन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस सोलापूर येथील कला प्रशिक्षक विकास गोसावी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व कागदी पिशव्या कसे बनविणे, कोणत्या प्रकारचे कागद वापरणे, कोणते कोणते साहित्य सामग्री वापरावी याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत दैनंदिन वापरातील बातमीपत्र व कलरफुल कागदापासून १ किलो वजनापासून ५ किलो वजनापर्यंत सामान वाहून घेणाऱ्या आकर्षक व पर्यावरण पुरक अशा अशा कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कागदी पिशव्याला कॅरीबॅगचा पर्याय मानून व रोजगाराच्या संधी जाणुन कागदी पिशव्या निर्मिती करण्याचे ठरवण्यात आले. या प्रशिक्षणात ९० महिलांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत उत्साहात ५ तासाचे हे प्रशिक्षण पार पडले.

हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शहर अभियान व्यवस्थापक राखी भावठाणकर, समीर मुलानी, चंद्रकांत तोडकर, समुदाय संघटक सचिन पांचाळ व सदरील संस्थेचे अलीम शेख व परमेश्वर पवार यांनी विशेष प्रयत्न केले.