
सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आता मी घरात बसणार नाही, तुम्हाला आता मैदानात दिसेन. मी निवडणुकीत पडले, पण आता त्यांना पाडायची वेळ आली आहे, असे वक्तव्य करत समर्थकांसमोर लढण्याचा निर्धार केला. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. या वक्तव्यानंतर त्यांचे राजकीय विरोधक अलर्ट मोडवर आले आहेत. आता या पुढे रणनीतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घेत आहेत. तसेच या वक्तव्यानंतर परळीत बैठकांचे सत्र आयोजित केले जात असून या बैठकांचे कारण समजू शकलेले नाही. आता मात्र पंकजा यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर 24 तासातच अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे अलर्ट झाले आहेत. त्यांनी बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अजित पवार गटातील कार्येकर्ते,आजी – माजी पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले होते. नाथरा येथे दुपारी 2 वाजता शहरी भाग तर त्यांनतर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. धनंजय मुंडे यांनी 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा 30,000 हुन अधिक मतांनी पराभव केला होता. मात्र, आता राजकीय विरोधकांना कोणताही फायदा मिळू नये, यासाठी ते आखणी करत आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदार संघातील निवडणूक कोणत्याही उमेदवारासाठी सोपी नसणार, याचेच संकेत मिळत आहेत.
























































