
सामना प्रतिनिधी। परभणी
शहरासह जिल्ह्यात हिवाळ्यामध्ये तापमानाने निच्चांकी गाठली होती. हे तापमान तीन अंशावर खाली आले होते. त्यापाठोपाठ मार्च महिना लागलाच तापमानामध्ये दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याने तापमानाचा पारा आज मंगळवारी 37. 7 अंशावर गेला आहे. त्यामुळे उकाडा मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. दुपारी 12 नंतर रस्त्यांवर अक्षरश: शुकशुकाट दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अडगळीस विश्रांती घेत असलेले कुलर आणि छत्र्या हळूहळू बाहेर निघू लागल्या आहेत. ग्रामीण भागात मात्र नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरीने तळ गाठल्याची स्थिती सर्वत्र पहावयास मिळत आहे.
यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. दिवसेंदिवस दिवस हे चित्र गडद बनत आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच तापमानाचा पारा 38 अंशांवर स्थिरावत आहे. त्यामुळे सुरुवातीलाच कमालीचा उकाडा जाणवत आहे. कमी पावसामुळे ऑक्टोबर हिट मध्येच परभणीतील पाणी पातळी खोल गेली होती. सोनपेठ भागात सर्वाधिक पाणीपातळी खोल गेली आहे. तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात केवळ 4 तालुक्यात 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 81 विहिरी आधिगृहीत करण्यात आल्याने अंशत: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच पाणीटंचाई निवारण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर लागली आहे. परभणी शहरात 10-12 दिवसाला महानगरपालिका पाणीपुरवठा करत आहे. तापमानात अशीच वाढ होत राहील्यास पाणीपुरवठा हा तब्बल 15 दिवसांनी केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बहुतांश भागामध्ये अडगळीस ठेवलेले कुलर आणि छत्र्या बाहेर काढल्या जात आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी शहरातील मध्यवस्तीसह बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात शीतगृहांची संख्या वाढत आहे. बाजारपेठेत विविध प्रकाराची फळे आली आहेत. यात टरबुज, खरबूज, अननस, अंगूर, मोसंगी, चिकू, संत्री आदी मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असताना वीज वितरण कंपनी वीजग्राहकांना बिलाचा तगादा लावत ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित करण्यावर भर देत आहे. मार्च एंण्डच्या नावाखाली वीज कंपनीने वसुलीचा तगादा लावला आहे. महिला व युवतीं सनकोटचा आश्रय घेऊनच घराबाहेर पडत आहेत. उन्हाचा कडाका वाढल्याने अनेकजण घराबाहेर पडताना रुमाल, गमच्या, सन गॉगल्स, टोप्यांचा वापर करताना दिसत आहेत. बाजरापेठेत मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या रुमालांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
चारठाणा : ऊन्हाळाची चाहूल लागली असून फॅन, कुलर व वातानुकूलीत विद्युत उपकरणांची मागणी वाढली आहे. साधारणत: 1 हजार 500 रुपयांपासून कुलर उपलब्ध झाले आहेत. सध्या स्थितीला फायबर, लोखंडी, स्टील आदीसह विविध नामांकीत कंपन्यांचे कुलर बाजारात उपलब्ध झाली आहेत.
































































