परभणीचा बालेकिल्ला अभेद्यच राहणार-रवींद्र वायकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शिवसेनेचा परभणी जिल्हा बालेकिल्ला असून तो अभेद्दच राहणार आहे, असा दुर्दम्य आत्मविश्वास शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज व्यक्त केला. शिवसेना-भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार संजय जाधव यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार विनोद घोसाळकर, आमदार रमेश लटके, मुंबईचे उपविभागप्रमुख अशोक पटेल, माजी संपर्कप्रमुख प्रभाकर सामंत, आमदार डॉ. राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, मोहन अग्रवाल, गंगाप्रसाद आणेराव, संदीप भंडारी, सखुबाई लटपटे, गटनेता चंदू शिंदे, माणिक पोंढे, उदयदादा देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवरायांचे पूजन आणि त्यानंतर फित कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटनानंतर पुढे बोलताना राज्यमंत्री वायकर म्हणाले, परभणी जिल्ह्यात आपण सात वर्ष संपर्कप्रमुख म्हणून काम केलेले आहे. या जिल्ह्यातील शिवसैनिकांचा कडवटपणा आणि शिवसेनाप्रमुखांप्रती असलेली निष्ठा आपणास ज्ञात आहे. त्यामुळे कोणी कितीही विरोधकांनी वल्गना केल्या तरी काहीच फरक पडणार नाही. परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक आपला बाणेदापणा जपत बालेकिल्ला अभेद्द राखल्याशिवाय राहणार नाही. या जिल्ह्यावर शिवसेनाप्रमुखांचे विशेष प्रेम होते. याच जिल्ह्यातील लोकसभेच्या विजयामुळे शिवसेनेला मान्यता भेटलेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासुद्धा परभणी जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी झपाटून कामाला लागावे आणि प्रचंड बहुमताने आपले लाडके उमेदवार संजय जाधव यांना विजयी करावे, असे आवाहनही यावेळी रवींद्र वायकर यांनी केले.

रात्री उशिरा राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी परभणी शहर आणि जिल्ह्यातील जुन्या जाणत्या व ज्येष्ठ शिवसैनिकांसह समाजातील मान्यताप्राप्त प्रतिष्ठीतांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाभरातून मोठी उपस्थिती लाभली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपल्या खास शैलीत रवींद्र वायकर यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या विजयासाठी विशेष संदेश दिला.