Parliament Security Breach – अमोलची पोलीस भरतीची तयारी, तर उच्चशिक्षित असूनही नीलम बेरोजगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेसमोर ‘स्मोकबॉम्ब’ फोडून खळबळ उडवून देणारा अमोल धनराज शिंदे (25) हा तरुण लातूर जिल्हय़ातील झरी गावचा आहे. ही घटना घडताच लातूर पोलीस अमोलच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले. अमोलच्या आई-वडिलांनी तो भरतीसाठी जातो सांगून बाहेर पडल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्याच्या आई-वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. ते मोलमजुरी करतात. लष्करात जाण्याचे अमोलचे स्वप्न होते. लष्कर भरतीसाठी तो आसामलाही गेला होता. परंतु पंचविशी ओलांडल्याने त्याचा लष्करभरतीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे तो निराश होता. तो उत्तम धावपटू आहे. अमोलचे काही शैक्षणिक कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतले, असे अमोलच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

उच्चशिक्षित असूनही नीलम बेरोजगार

संसदेच्या बाहेर आंदोलन करणारी हरयाणाची नीलम सिंह ही उच्चशिक्षित असून तिने बीए, एमए, बीएड, एमएड, सीटीईटी, एमफील आणि नेट परीक्षा उतीर्ण केलेली आहे. उच्चशिक्षित असूनही तिला नोकरी मिळाली नाही. तिने याआधी बेरोजगारीच्या मुद्दय़ावरून अनेक वेळा आंदोलनही केले आहे. तसेच तिने शेतकरी आंदोलनातही सहभाग घेतलेला आहे.

उच्चविद्याविभूषित असलेली नीलम ही शेतकरी आंदोलनांशी निगडित असून संयुक्त किसान मोर्चाने तिच्या सुटकेची मागणी केली आहे. नीलमला सोडले नाही तर आम्ही मोठे पाऊल उचलू, असा इशारा त्यांनी दिला आहे.