
सामना ऑनलाईन । बंगळुरू
गौरी लंकेश हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) सादर केलेल्या व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती ही परशुराम वाघमारेच असल्याचे गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबने स्पष्ट केले आहे. लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाचे मोठे यश मानले जात आहे. 5 सप्टेंबर 2017 मध्ये लंकेश यांच्या घरात घुसून त्यांची हत्या करण्यात आली होती.
गौरी लंकेश यांची हत्या झाली त्या दिवशी हाती लागलेला घटनाक्रमानुसार बनवण्यात आलेला व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज गुजरातच्या न्यायवैद्यक संचालनालयाला पाठवण्यात आला होता. त्यांनी त्याची तपासणी करून त्या व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती हा वाघमारेच असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होणार आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीने आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी महाराष्ट्र आणि गोव्यातील आहेत.
























































