कोकण मार्गावरील पॅसेंजर ट्रेन अखेर सुरू, दोन वर्षांनी चाकरमान्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे बंद असलेल्या कोकणातील पॅसेंजर ट्रेन जवळपास दोन वर्षांनी गणेशोत्सवानिमित्त सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे या ट्रेन संपूर्ण आरक्षित असणार आहेत. या ट्रेनला जादा थांबे असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. दिवा-सावंतवाडी, दिवा-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव या गाडय़ा पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. या पॅसेंजर गाडय़ा सीटिंग असून त्यांचे आरक्षण सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याने चाकरमान्यांचा फायदा होणार आहे.

कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदाही गणेशोत्सव फारशी गर्दी न करता घरगुती स्वरूपात साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. कोकणातील नियमित गाडय़ांचे आरक्षण 120 दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. तर जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल 213 गणपती विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत यातील 90 टक्के गाडय़ांची तिकिटे आरक्षित होऊन प्रवाशांच्या हाती तीनशेच्या पुढील ‘वेटिंग लिस्ट’ पडली आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवात 7 सप्टेंबरपासून सोडलेल्या पॅसेंजर गाडय़ांमुळे चाकरमान्यांना फायदा होणार आहे.

जनरल तिकीट नसणार

ट्रेन क्र.01506 / 01505 दिवा ते सावंतवाडी, ट्रेन क्र. 01504 / 01503 दिवा ते रत्नागिरी आणि ट्रेन क्र. 01501 / 01502 रत्नागिरी ते मडगाव या पॅसेंजर गाडय़ांचा यात समावेश असून या पॅसेंजर गाडय़ांना सर्व स्थानकांना थांबा देण्यात आला आहे. मात्र या गाडय़ांना जनरल तिकिटे नसणार. केवळ आरक्षित प्रवाशांनाच यातून प्रवास करता येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. गणपती सणाच्या सर्व गाडय़ांचे आरक्षण फुल झाले असल्याने पॅसेंजर ट्रेनमुळे दिलासा मिळणार आहे. दिवा-सावंतवाडी दिवा येथून स. 6.15 वा. सुटायची. आता ती स. 6.55 वा. सुटणार आहे. नवे आचिर्णे स्थानक सुरू झाल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुरू केल्याने प्रवाशांना आता वैभववाडीला उतरण्याची गरज नाही, असे प्रवासी बळीराम राणे यांनी सांगितले.