
पाथर्डी तालुक्यात एकाच आठवडय़ात दोन बिबटय़ांना पकडण्यात वन विभागाला यश आले असून, रविवारी रात्री नऊ वाजता तालुक्यातील शिरसाठवाडीलगत असलेल्या वडदरा डोंगराच्या पायथ्याला वन विभागाने लावलेल्या पिंजऱयात एक बिबटय़ा अडकला.
चार दिवसांपूर्वी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव येथे एका पिंजऱयात मादी बिबटय़ा आढळून आला होता. पाठोपाठ दुसरा बिबटय़ाही जेरबंद झाल्याने नागरिकांमधील भीतीचे सावट काही प्रमाणात कमी झाले आहे.
पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी व शिरापूर येथील तीन बालकांना बिबटय़ाने उचलून नेत ठार केल्याच्या घटना मागील महिन्यात घडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. या घटनेची वन विभागाने तातडीने दखल घेत तालुक्यात संभाजीनगर, नाशिक, नगर येथील खास पथकांना पाचारण केले होते. सर्व परिस्थितीवर जिल्हा वनसंरक्षण अधिकारी आदर्श रेड्डी हे लक्ष ठेवून होते.
या पथकांनी बिबटय़ा पकडण्यासाठी तालुक्यात एकूण 14 ठिकाणी पिंजरे लावले होते. रविवारी रात्री नऊच्या सुमारास वडदरा डोंगराच्या पायथ्याला लावलेल्या पिंजऱयात चार वर्षांची बिबटय़ाची मादी जेरबंद झाली. त्याच्या डरकाळ्यांनी परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. आज सकाळी संभाजीनगर येथील वन विभागाचे अधिकारी सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक या डोंगरात गेले. त्यांनी या बिबटय़ाला ताब्यात घेत तातडीने जुन्नर येथे हलवले.
अन्य पिंजऱयांवरही लक्ष ठेवणार!
एकाच आठवडय़ात लागोपाठ दोन बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये समाधान पसरले असून, पकडलेले दोन्हीही बिबटे नरभक्षक आहेत की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या लावण्यात आलेल्या अन्य पिंजऱयांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे आदर्श रेड्डी यांनी सांगितले आहे. नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.


























































