
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तसेच शेवगाव तालुका हे विकासापासून वंचित असून दुष्काळी आहेत. यंदा पाथर्डी ते शेवगाव तालुक्यातील गावांमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडला असून शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सरकारने तसेच केंद्र सरकारने याबाबतचा योग्य तो निर्णय घेतला नसून पाथर्डी व शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चांदणी चौकात रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी व शेवगाव दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. जनावरांच्या चारा छावण्या चालू करण्यात याव्या. शेतकऱ्यांना शेती विषयी शासकीय अनुदान मंजूर करावे तसेच पाथर्डी शेवगाव तालुक्यातील सर्वच गावात वाड्या वस्तीवर शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा करावा. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यात यावे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग राज्य मार्ग सर्व मार्गांवरील गावातील रस्ते वाहतुकीसाठी व्यवस्थित करावे तसेच राज्य महामार्गावरील रस्त्यांचे सर्व कामे करण्यात यावे. श्री क्षेत्र भगवानगड तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ते श्री शेत्र गहिनीनाथ गड चिंचोली पाटोदा हा मार्ग केंद्रीय मार्ग निधी संकल्प अंतर्गत मंजूर करून डांबरीकरणाचे काम करण्यात यावे. पाथर्डी शेवगाव मधील वाड्या वस्त्यांवरचे व राज्य महामार्ग कामे जलगतीने करण्यात यावे व पाथर्डी शेवगाव तालुक्यातील सर्वच गावांना तसेच वाडी वस्त्यांवरील लोकांना जिल्हा परिषद नगर ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याचे पाणी पाईपलाईन मार्फत देण्यात यावे व पाथर्डी शेवगाव तालुक्यातील पांजर तलावाचे दुरुस्ती करुण मजबुतीकरण खोलीकरण करण्यात यावे. नवीन बंधाऱ्याची स्थापना करण्यात यावी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तीगृह मंजूर करण्यात यावे मुळा व जायकवाडी धरणाचे पाणी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 262 गावांना शेतीसाठी पाईप लाईन मार्फत देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी आज सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांच्या नेतृत्वाखाली नगर सोलापूर हायवे नगर पुणे येथील चांदणी चौक येथे रस्ता रोको करण्यात आले.
























































