
सामना प्रतिनिधी । हडपसर
पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ लावणी नृत्यांगना रेखा काळे नेर्लेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ भास्करराव खांडगे पुरस्कार ज्येष्ठ कलावंत जयमाला इनामदार यांना व कलावंताचे कैवारी बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार शाहीर देवानंद माळी यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे एकविसावे वर्ष आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे,कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे,महोत्सव समितीचे अध्यक्ष मित्रावरुण झांबरे यांनी दिली.
लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना हे पुरस्कार दिले जातात. पठ्ठे बापूराव पुरस्कार 21 हजार रुपये, डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार 11 हजार रुपये व बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार 5 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत ‘पुणे लावणी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. लोककलेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य उपलब्ध करून दिलेला आहे.
लावणी नृत्यांगना रेश्मा परितेकर, भरत हगवणे, डॉ. शंतनू जगदाळे, संदिप घुले, बापू जगताप, आकाश वाकचौरे यांनी पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले.
























































