हिंदू-मुस्लिम ऐक्याची ‘केरला स्टोरी’, अब्दुलच्या सुटकेसाठी उभारले 34 कोटी

सौदी अरबमध्ये मृत्यूच्या शिक्षेचा सामना करत असलेल्या एका व्यक्तीसाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक धावून आलेत. या दोन्ही समाजांतील लोकांनी एकजूटता दाखवत मुस्लिम व्यक्तीसाठी तब्बल 34 कोटी रुपयांची क्राऊडफंडिंग जमा केली. सौदी अरबमधील फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी अवघ्या चार दिवसांत 34 कोटी रुपये जमवले. हिंदू आणि मुस्लिम समाजातील व्यक्तींनी एकजूटतेचे दर्शन घडवत ही किमया केली.

केरळच्या कोझिकोडेमध्ये राहणारा मच्छिलाकाथ अब्दुल रहीमला वाचवण्यासाठी हे सर्व लोक एकत्रित आले. 18 एप्रिलपूर्वी 15 मिलियन सौदी रियाल म्हणजेच जवळपास 34 कोटी रुपये जमा करायचे होते. रहीमने 2006 मध्ये एका सौदी मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली 18 वर्षांचा कारावास भोगला. हत्येच्या आरोपाखाली 2018 मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु कुटुंबाला रहीमने ब्लड मनी दिल्यास माफ केले जाऊ शकते, असे सांगितल्यानंतर ही पैशांची जुळवाजुळव करण्यात आली. अवघ्या पाच दिवसांत एवढी मोठी रक्कम जमा करण्यात आल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ‘द रीअल केरल स्टोरी’ अशा शब्दांत पैसे देणाऱयांचे आभार मानले आहेत. खरं म्हणजे ही कामगिरी म्हणजे करूणा आणि सत्याची खरी ‘द केरला स्टोरी’ आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. विविध राजकीय संघटनांसोबत राज्याच्या विविध 75 हून अधिक संघटनांनी तसेच सर्वसामान्य लोकांनी या कामासाठी अथक प्रयत्न केले, असे अॅक्शन कमिटीने म्हटले. एक कोटी अवघ्या नऊ मिनिटांत जमा झाले. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे जवळपास एक हजार सदस्यांनी एक कोटी रुपयांची रक्कम अवघ्या नऊ मिनिटांत जमा केली. यामध्ये कतार, यूएई, सौदी अरब आणि अन्य गल्फ पंट्रीमधून हे पैसे देण्यात आले.

एवढी मोठी रक्कम जमा होईल, असे वाटले नव्हते. परंतु हे शक्य झाले आहे, अशा भावना अब्दुलच्या आईने व्यक्त केल्या. लोकांच्या सहकार्यामुळे अखेर माझा मुलगा घरी सुखरूप येईल, अशा भावनाही अब्दुलच्या आईने व्यक्त केल्या. 18 वर्षांनंतर आई आणि मुलाची भेट होणार आहे.