
गेल्या काही दिवसांमध्ये महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नजिकच्या काळामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट होण्याची शक्यता दर्शवली जात असून, तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेक (OPEC) आणि रशियासह व इतर सहकारी देशांनी जुलै-ऑगस्टपासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओपेक, रशिया सोबत इतर सहकारी देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन 6.48 लाख बॅरल वाढ करण्याचे ठरविले आहे. पुरवठा वाढल्यास जागतिक स्तरावरील पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत घट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोना काळात कच्च्या तेलाचा वापर खूप कमी झाल्यामुळे, क्रुड ऑईलच्या किंमती घसरल्या होत्या. त्यामुळे तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी त्याचे उत्पादन कमी केले होते. सध्या कच्च्या तेलाचे प्रतिदिन उत्पादन 4.32 लाख बॅरल इतके आहे.
रशिया- युक्रेन युद्धाने वाढवल्या तेलाच्या किंमती
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावरील तेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली. अमेरिका व इतर देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे संपूर्ण जगाला महागाईला सामोरे जावे लागले.
पेट्रोल- डिझेलचे सध्याचे दर
दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रूपये प्रति लिटर, तर डिझेल 89.62 रूपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रूपये तर डिझेल 97.28 रूपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रूपये व डिझेल 94.24 रूपये प्रति लिटर आहे.


























































