हिंदुस्थान- श्रीलंका दहशतवादाविरोधात एकत्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलंबो

मालदीव दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी श्रीलंका दौऱ्यावर पोहोचले आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. या दौऱ्यादरम्यान ते श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचीही भेट घेणार आहे. श्रीलंकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कोलंबोतील सेंट अँटनी चर्चला भेट देत एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. श्रीलंकेत इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 250 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 11 हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश होता. हिंदुस्थान आणि श्रीलंका दहशतवादाविरोधातील लढाईत एकत्र लढणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. याआधी मोदी यांनी 2015 आणि 2017 मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांचा हा तिसरा श्रीलंका दौरा आहे.

पंतप्रधान मोदी माजी राष्ट्राध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेते महिंद्रा राजपक्षे यांचीही भेट घेणार आहेत. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दहशतवादाच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले. मोदी यांनी श्रीलंकेतील राष्ट्रपती भवनाला भेट देत वृक्षारोपणही केले.‘शेजारी देशांना प्राधान्य’ हे धोरण समोर ठेवत श्रीलंका आणि मालदीव या दोन देशांचा दौऱ्यावर मोदी गेले आहेत. श्रीलंका दौऱ्यानंतर ते भारतात परतल्यावर थिरूमला येथील भगवान व्यंकटेश यांच्या मदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच ते या ठिकाणी पूजाही करतील.