ममता बॅनर्जींच्या विधानाचा आधार घेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा; मी प्रार्थना करतो की…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोमवारी लोकसभेतील भाषणात त्यांनी एनडीएचा आकडा 400 ओलांडण्याचा अंदाज वर्तवला होता. आता काँग्रेसबाबत ते म्हणाले की, पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस 40 चा आकडाही ओलांडू शकणार नाही असे आव्हान दिले होते. पण आता मी प्रार्थना करतो की किमान तुम्ही 40 जागा तरी वाचवून ठेवाल असा टोला काँग्रेसला लगावला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत भाग घेण्यासाठी पंतप्रधान राज्यसभेत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले की, बंगालमधून ममता बॅनर्जी यांनी तुमच्यासमोर आव्हान आले आहे की काँग्रेस 40 जागाही पार करू शकणार नाही. मी प्रार्थना करतो की तुम्ही 40 जागांचा आकडा पार करा. काँग्रेस आता विचारातही मागासलेली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आता त्यांनी त्यांचे काम आउटसोर्स केले आहे. या काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीचा गळा दाबला होता अशी टीका केली आहे.

सोमवारी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणादरम्यान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की खरगे यांनी दीर्घ भाषण केले आणि खूप काही बोलले. एवढ्या लांबलचक बोलण्याचं स्वातंत्र्य त्यांना कसं मिळालं, असा प्रश्न मला पडला होता. नंतर लक्षात आलं की सभागृहात दोन स्पेशल कमांडो असतात ते कमांडो त्या दिवशी सभागृहात नव्हते. खरगेंनी त्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला आणि चौकार-षटकार खेचले, असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसने मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करला आहे. 2009 मध्ये पक्षाने 206 जागा जिंकल्या. मात्र त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली आणि 2014 च्या निवडणुकीत 72 जागा जिंकल्या होत्या आणि पाच वर्षांनंतर केवळ 44 जागा जिंकल्या होत्या. आता तर ममता बॅनर्जी यांनी काँंग्रेसचा 40 चाही आकडा पार करू शकणार नाही असं जाहीर विधान केलं आहे.