
त्रिपुरातील हिंसक घटनेचे पडसाद उमटलेल्या अमरावतीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून अमरावतीमध्ये चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अफवा पसरू नयेत म्हणून तेथील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. अमरावतीपाठोपाठ अकोल्यातील अकोटमध्येही दगडफेकीच्या घटना घडल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून पुणे जिह्याच्या ग्रामीण भागातही जिल्हाधिकाऱयांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
अमरावतीसारख्याच दगडफेकीच्या घटना अकोल्यातील अकोट शहरात घडल्या. हनुमान नगर आणि नवगाजी प्लॉट येथे शनिवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्याची गंभीर दखल उपविभागीय अधिकाऱयांनी घेतली आणि शनिवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली. संचारबंदीच्या काळात आरोग्य सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद राहणार आहेत. पत्रकारांनी बातम्या पाठविण्यासाठी थेट 50 किलोमीटर दूर जावे, असे आदेश गृहखात्याने दिले आहेत.
पुणे ग्रामीण भागात कलम 144 लागू
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुणे जिह्याच्या ग्रामीण भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. राज्यात घडलेल्या हिंसक घटनांचा गैरफायदा घेऊन समाजपंटकांकडून सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवल्या जाऊ शकतात अशी शक्यता लक्षात घेऊन ही जमावबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पाठवली गेली तर ग्रुप अॅडमीनवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.
मुंबईत पोलिसांची खास गस्त
मुंबई पोलिसांनी शहरात रूट मार्च केला. रूट मार्चप्रमाणे तसेच पोलीस सोशल मीडियावर देखील नजर ठेवून आहेत.
त्रिपुराच्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटू नयेत याची मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांनी आज मुंबईत सर्वत्र रूट मार्च केला. मुंबई पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी विशेष गस्त वाढवली आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांवर पोलीस नजर ठेवून आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
धार्मिक भावना भडकवणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असे व्हिडीओ खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
























































