रेखा जरे हत्या प्रकरण – तपासासाठी बाळ बोठेला नगर शहरातून फिरविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार, आरोपी पत्रकार बाळ बोठे याला आज तपासासाठी नगर शहरातील विविध ठिकाणी नेण्यात आले होते, तर त्याचा सुरुवातीला जप्त केलेला मोबाईल उघडण्यासाठी सायबर विभागाच्या एका टीमला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, याच घटनेतील आरोपी महेश तनपुरे याच्याकडे असलेले त्याचे फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

रेखा जरे हत्याकांडमध्ये दहा आरोपींचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी बाळ बोठे हा नाव जाहीर झाल्यापासून फरार झाला होता. तब्बल तीन महिन्यांनंतर नगरच्या पोलिसांनी त्याला हैदराबादमधून अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आरोपी बाळ बोठेकडून माहिती घेत आहेत. मात्र, तो काहीच माहिती देत नसल्यामुळे त्याला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तो माहिती देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ज्यावेळी बोठे फरार झाला होता, त्यावेळी घराच्या झाडाझडतीत पोलिसांनी दोन मोबाईल तसेच अनेक वस्तू जप्त केल्या होत्या. यामध्ये आयफोनचा समावेश आहे. या आयफोनमध्ये महत्त्वाचे व्हिडीओ तसेच काही माहिती आहे. बोठे फरार झाल्यापासून हा फोन पोलिसांच्या ताब्यात होता. आता तो फोन उघडण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. आता फोन उघण्यासाठी आज स्वतंत्र पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्या दृष्टीने आता सायबर टीम काम करीत आहे, तसेच बोठे याला आज शहरातील विविध ठिकाणी तपासणीसाठी तपासी अधिकारी अजित पाटील यांच्या पथकाने नेले होते. तो ज्या ज्या ठिकाणी गेला होता तेथे तेथे नेऊन तपासणी करण्यात आली.

हैदराबादमध्ये बोठे जो मोबाईल वापरत होता, तो कुणाचा आहे याची माहिती पोलिसांनी मागवली आहे. हैदराबाद येथील अटक असलेला वकील जनार्दन अकुला याच्या नावाने हा फोन घेतला असावा, त्यादृष्टीने तपास सुरू आहे, तसेच तो तेथे वास्तव्यास केव्हापासून होता, तसेच त्याने मध्यंतरीच्या काळामध्ये कोणाकोणाची मदत घेतली याचासुद्धा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

महेश तनपुरेचा फोन फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला

बोठे फरार झाल्यानंतर तो त्याच्या घरच्यांशी संपर्कात होता. तो त्याचा मित्र महेश तनपुरे याच्या मोबाईलवरून कॉलिंग करत होता. त्यानंतर घरच्यांशी संवाद साधत होता. त्यामुळे तनपुरे याच्या घरातून जे काही मोबाईल हस्तगत केले आहेत ते पुढील तपासासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. त्यामुळे आता त्या तपासणीमध्ये नेमके काय काय बाहेर येते, हे लवकरच समजू शकणार आहे.