पोलीस डायरी – दूध नव्हे, विषाचा प्याला! ‘मोक्का’ लावा, भेसळखोर पळून जातील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<प्रभाकर पवार
[email protected]

‘‘तुकाराम हरिभाऊ मुंढे. ये नाम ही काफी है!’’ आयएएस तथा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त यांच्या नावाचा तंबाखू, गुटखा, तंबाखूजन्य, दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माफियांनी धसका घेतला असल्याचे बोलले जात असताना मुंबई क्राईम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, कृष्णकांत उपाध्याय, नवनाथ ढवळे, रवींद्र अडाणे या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे व संदीप येडेपाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोरेगाव (प.), प्रेमनगर व दहिसर (पूर्व), राजेश कम्पाऊंड, दुबे चाळ येथे पहाटेच्या वेळेस धाड घालून अमूल व गोकुळ या प्रसिद्ध (ब्रँडेड) कंपनीच्या नावाच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करणाऱ्या तामिळनाडूच्या दोन टोळ्यांना अलीकडे अटक केली. याचा अर्थ स्पष्ट आहे, दूधभेसळ माफिया कोणालाच घाबरत नाहीत. तुम्ही कितीही कठोर कारवाई करा. ‘‘लोकांना रोज विष पाजणे हा आमचा व्यवसायच आहे’’ असे पकडण्यात आलेले भेसळखोर आरोपी बोलत आहेत.

पोलिसांनी दहिसर व गोरेगाव येथे धाड घालून दाक्षिणात्य टोळ्या पकडल्या, परंतु प्रसिद्ध कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करून त्या पिशव्या रोज सकाळी मुंबईतील घराघरांमध्ये वाटल्या जात आहेत असे जाणकार सांगत आहेत. दूध म्हणजे संपूर्ण अन्न हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, दूध म्हणजे पोषण की विष, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहिला आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून ओळखला जात होता, परंतु दुर्दैवाने आता त्याच देशाला दूधभेसळीचा देश म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. तुकाराम मुंढे यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना, ठाणे आदी जिल्ह्यांत धाडी टाकून कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश केला. दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी डिटर्जंट पावडर, शॅम्पू, पाम तेल, इमल्सिफायर आदी प्रकारची रसायने जप्त केली तरीही अद्याप दुधातील भेसळ थांबलेली नाही हे मुंबईतील पोलिसांच्या धाडीवरून दिसून येत आहे. मोठा ब्रँड म्हणजे हमखास सुरक्षित दूध असे अमूल व गोकुळ दुधाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वाटत होते, परंतु नागरिकांनी ब्रँडवर किंवा जाहिरातीवर विश्वास ठेवून कोणतीही वस्तू खरेदी करणे धोक्याचे आहे.

दूध हा फक्त फसवणुकीचा विषय नाही. तो बालकांचा, गर्भवती मातांचा, रुग्णांचा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. दुधात भेसळ करणारे समाजाच्या आरोग्यावर हल्ला करणारे खतरनाक गुन्हेगार आहेत. त्यांचे लागेबांधे राजकीय पुढाऱ्यांशी असतात. बऱ्याच दूध कंपन्यांमध्ये राजकीय पुढाऱ्यांचीच गुंतवणूक आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी सरकारने कितीही जलदगती न्यायालये स्थापन केली तरी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करणाऱ्या धुरंधर राजकारण्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावणे तितकेसे सोपे नाही. ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई केली तरच दूध व दुग्धजन्य पदार्थांची, तंबाखू, गुटख्याची खरेदी-विक्री थांबेल. खाद्यपदार्थांतील भेसळीवर नियंत्रण येईल.

एकट्या तुकाराम मुंढेंनी भेसळखोरांना गुडघ्यावर आणले आहे. मग असा प्रश्न पडतो, इतके दिवस सत्ताधारी काय करीत होते? ‘एफडीए’च्या आयुक्तांना, अधिकाऱ्यांना खुलेआम होत असलेली जीवघेणी दूधभेसळ कधी दिसली नाही का? कशी दिसेल? अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याच कार्यालयात त्यांचा कर्मचारी लाच घेताना अलीकडे पकडला गेला. ज्यांच्यासाठी लाच मागितली गेली होती त्या मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खासगी सचिवाला अभय देण्यात आले. गुन्हेगारांना, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सत्ताधारीच असतील तर सामान्य माणसाला कशी सुरक्षित अन्न व औषधे मिळतील?

आईच्या हातात दुधाचा ग्लास आहे की विषाचा प्याला आहे, हे त्या आईच्या बालकाला किंवा त्या आईला तरी कसे कळणार? भेसळखोरांनी कुठलाच अन्नपदार्थ सुरक्षित ठेवला नाही. अगदी मंदिरातील प्रसादही! तो जर दुग्धजन्य असेल तर त्याचीही खात्री नाही. प्रसादही दूषित असू शकतो. नव्हे, मंदिरातील प्रसाद खाऊन विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

तेव्हा जनहो, सावधान! आपल्या घरात येणारा प्रत्येक अन्नपदार्थ काळजीपूर्वक तपासा! दुधाची बाटली १०-१५ सेकंद जोरात हलवा. जर भरपूर फेस आला आणि तो लवकर गेला नाही तर यात डिटर्जंट असू शकते. अस्सल दुधाला फेस कमी असतो. दूधभेसळ ओळखण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. पनीरचा तुकडा गरम पाण्यात ५ मिनिटे ठेवा. तो मऊ झाला आणि फाटला नाही तर अस्सल! प्लॅस्टिक किंवा डिटर्जंट असलेले पनीर असेल तर कडक राहते किंवा वितळते!

प्रत्येक उत्पादनाच्या लेबलवर त्यातील घटकांची नोंद असते ती वाचण्याचे कष्ट कोणीही घेत नाही. त्यामुळेच आज भेसळखोर माफियांनी सर्वत्र आतंक माजवला आहे. एकटे तुकाराम मुंढे किती जणांविरुद्ध लढणार? लोकांनी, ग्राहकांनी साथ दिली तर नक्कीच कर्तव्यकठोर, कोणाशीही तडजोड न करणाऱ्या तुकाराम मुंढेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मोहिमेला यश येईल. मुंबई पोलीस, विशेषतः क्राईम ब्रँच आता दुधात भेसळ करणाऱ्या माफियांच्या मागे लागली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने ठरवले तर मुंबईतून दुधात भेसळ करणारे दाक्षिणात्य माफिया हद्दपार होतील. पोलिसांनी अशा टोळ्यांना ‘मोक्का’ लावावा. मुंबई नक्कीच दूधभेसळमुक्त होईल.