४८ सीसीटीव्ही, ४५ पोलीस, ४८ तास शोध; घर सोडून गेलेली ७ वर्षांची चिमुकली पुन्हा कुटुंबात परतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवा परिसरातून घर सोडून गेलेली ७ वर्षांची चिमुकली पुन्हा आज कुटुंबात परतली. मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी ९४८ सीसीटीव्ही फुटेज तपासले असून यासाठी ४५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अवघ्या ४८ तासांत चिमुकलीचा शोध घेतला. त्यानंतर ती बदलापुरमध्ये सापडली. साक्षी पांडे असे तिचे नाव आहे. दरम्यान सहा विशेष पथकांच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा करण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले आहे. साक्षी सुखरूप घरी येताच नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कौटुंबिक तणाव व घरातील सततच्या कामाला कंटाळून कुणालाही न सांगता साक्षीने आपल्या दिव्यातील घरातून २८ मे रोजी रात्री निघून गेली होती. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर तिच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी सहा विशेष पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली. मुलगी सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ठाणे शहर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत त्या मुलीला पालकांच्या स्वाधीन केले.