चाळीस कामगारांना टाकून रेल्वेचा ठेकेदार पळाला, पोलिसांनी दिला मदतीचा हात

333

 ज्या गोरगरीब कामगारांच्या जीवावर ठेकेदार गब्बर होतात त्याच कामगारांना ‘कोरोना’चे संकट सुरू होताच वार्‍यावर सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कामगारांना पगारही न देता संबंधित ठेकेदार पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. अग्रवाल असे या मुजोर ठेकेदाराचे नाव आहे. मात्र खाकी वर्दीतील माणुसकीने या कामगारांना मदतीचा हात दिला असून त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची तसेच राहण्याची देखील व्यवस्था पोलिसांनी केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच व सहा येथे रेल्वे रुळाचे काम गेले काही दिवस सुरू होते. तेथे चाळीस कामगार काम करीत होते. कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याचे बघून ठेकेदार अग्रवालने थेट काढता पाय घेतला. या कामगारांना रोज पगार दिला जायचा पण गेल्या दोन दिवसांपासून त्यांना एकही रुपया देण्यात आला नाही. बिहार,उत्तर प्रदेश आदी विविध ठिकाणांहून आलेले हे कामगार रोजीरोटीसाठी ठाण्यातील ठेकेदाराकडे रोजंदारीवर काम करीत होते .मात्र कोरोना संकटामुळे ठेकेदार अगरवाल याने या कामगारांची साधी विचारपूसही केली नाही. एवढेच नव्हे तर कुणालाही न सांगता अग्रवाल गायब झाला.

हँड सॅिनटायझर आणि मास्कही दिले
ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव सोमवंशी यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह तातडीने धाव घेऊन बेघर झालेल्या कामगारांची विचारपूस केली. तसेच त्यांना दोन वेळचे जेवणही दिले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था ठाण्यातील सिडको बस स्टॉप जवळील कोळी समाजाच्या हॉलमध्ये करण्यात आली आहे. कामगारांना हँड सॅनिटायझर आणि मास्क तसेच अन्य गरजेच्या वस्तूही देण्यात आल्या.

चौकशी करणार
या कामगारांसोबत त्यांची लहान मुले व परिवार असून त्यांना रोज दोन वेळेचे जेवण उपलब्ध व्हावे म्हणून ठाण्यातील विविध सामाजिक संस्थांची पोलिसांनी मदत घेतली आहे. दरम्यान, पळून गेलेल्या अग्रवाल या ठेकेदाराचा पोलीस शोध घेत आहेत. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त कुंभारे, डीसीपी सुभाष बोरसे, दिलीप माने यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. बेघर कामगारांना मदतीचा हात दिल्याबद्दल खाकी वर्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या