
क्राइम ब्रँचच्या समाजसेवा शाखेने अंधेरीच्या दीपा बारवर शनिवारी कारवाई केली. कारवाई करून पोलिसांनी बारच्या तळघरात लपून बसलेल्या 17 मुलींची सुटका केली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी बारच्या मॅनेजरसह अकरा जणांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
अंधेरी पूर्व परिसरात असलेला दीपा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. बारमध्ये ग्राहक महिलांवर पैसे उडवत असल्याची तक्रार एका एनजीओने समाजसेवा शाखेकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत शनिवारी रात्री समाजसेवा शाखेने दीपा बारवर छापा टाकला. पोलीस आणि एनजीओचे सदस्य हे कारवाई दरम्यान बारमध्ये आले. तेव्हा पोलीस हे मेकअप रूममध्ये गेले असता तेथे पोलिसांना एक आरसा दिसला. तो आरसा पोलिसांना संशयास्पद वाटल्याने तो आरसा पोलिसांनी हटवला. आरसा हटवताच तेथे पोलिसांना एक खोली दिसली. त्या खोलीत 17 मुली या कारवाईच्या भीतीने लपून बसल्या होत्या. त्या तळघरात सर्व सुविधा असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. डान्सबार प्रकरणी समाजसेवा शाखेने सवा लाखाची रोकड, लॅपटॉप, दोन मशीन जप्त केल्या आहेत. पोलिसांनी बारचे दोन मॅनेजर, चार वेटर आणि ग्राहक असे मिळून अकरा जणांना अटक करून अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले.































































