
सामना प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी येथे राहणाऱ्या आस्मा शेखच्या हत्येप्रकरणी एका मुख्य संशयिताला गुरुवारी डी. एन. नगर पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले. संशयिताला ताब्यात घेण्याकरिता पोलिसांचे पथक कर्नाटकच्या गुलबर्गा येथे गेले होते. यापूर्वी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आस्मा ही अंधेरी परिसरात राहत होती. गेल्या शनिवारी तिचा मृतदेह अंधेरीच्या वायरलेस कंपाऊंड येथे आढळून आला होता. आस्माच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या झाली होती. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याची कसून पोलीस चौकशी करत आहेत. त्याच्या चौकशीत एका मुख्य संशयिताचे नाव समोर आले होते.
अतिरिक्त आयुक्त मनोज शर्मा, परिमंडळ-9 चे उपायुक्त परमजितसिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक संभाजीनगरला गेले होते. संशयित हा काही वेळ तेथे थांबला. पोलीस तेथे पोहचण्याचा अर्धा तास अगोदर संशयित तेथून पळून गेला होता. त्यानंतर तो नागपूरमार्गे कर्नाटकला गेला होता. तेथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याला मुंबईत आणले जाणार आहे. चौकशीनंतर काही बाबींचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


























































