जमावबंदी मोडून लोक रस्त्यावर, जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली सिगारेट, तंबाखूची खरेदी

1055

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काल शंभर टक्के बंद पाळून शिस्तीचे अद्भुत दर्शन घडवणार्‍या नागरिकांनी अवघ्या काही तासातच बेजबाबदारीचे ओंगळ प्रदर्शन करून रस्त्यावर एकच गर्दी केली. जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली सिगारेट, तंबाखूच्या खरेदीसाठी रांगा लागल्या. रस्ते रिकामे दिसले म्हणून दुचाकी, चारचाकी सुसाट धावल्या. सरकार, प्रशासन तसेच पोलिसांच्या सक्त सूचनाही नजरेआड करून लोकांनी बिनधास्त जमावबंदीची ऐशीतैशी केली. या बेजबाबदारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतप्त ट्विट केले असून कोरोनाच्या संदर्भात देण्यात आलेल्या सूचनांची राज्य सरकारांनी सक्तीने अंमलबजावणी करावी, असे कडक निर्देशही त्यांनी दिले.

कोरोना व्हायरसचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कफ्र्यूचे आवाहन केले होते. सकाळी 7 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत लोकांनी घरातच राहावे. कोणीही बाहेर पडू नये असे त्यांनी आवाहनात स्पष्ट म्हटले होते. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, होम डिलिव्हरी करणारे यांना धन्यवाद देण्यासाठी लोकांनी घराच्या दरवाज्यात, बाल्कनीत उभे राहून टाळ्या वाजवाव्यात, थाळीनाद करावा असेही त्यांनी आवाहन केले होते.

पंतप्रधानांच्या आवाहनाला देशभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. देशातील नागरिकांनी शंभर टक्के जनता कफ्र्यू यशस्वी केला. रस्त्यावर चिटपाखरूही फिरकले नाही.

पाच वाजता बेशिस्तीचा नाद

सायंकाळी पाच वाजताच लोक घराच्या बाल्कनीत आले. दरवाज्यात आले. त्यांनी टाळ्या वाजवल्या. थाळीनाद केला. मात्र काही ठिकाणी याचा उच्छाद झाला. लोकांनी फटाके फोडले, ढोलताशे बडवले, एवढेच नाहीतर मिरवणुका काढल्या. पाच वाजता घराबाहेर पडलेले लोक रात्री उशिरापर्यंत घरात परतलेच नाहीत. या बेशिस्तीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला. पण याची भीती न बाळगता लोक रस्त्यावरच राहिले.

जमावबंदी धाब्यावर

जनता कर्फ्यू संपताच रात्रीची संचारबंदी लावण्यात आली. त्यानंतर सकाळपासून जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र जमावबंदी धाब्यावर बसवून लोकांनी रस्त्यावर गर्दी केली. घोळक्याने गप्पांचे फड रंगवले. एवढेच नाहीतर जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली सिगरेट, तंबाखूच्या खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा लागल्या. रस्ते रिकामे दिसले म्हणून दुचाकी, चारचाकी सुसाट धावू लागल्या. बेभान झालेल्या लोकांनी पोलिसांनाही जुमानले नाही.

कोरोनाचे संकट गंभीर, जबाबदारीने वागा

थाळीनाद करण्याच्या नादात लोकांनी केलेले बेशिस्तीचे प्रदर्शन पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच संतप्त झाले. आपल्या भावना त्यांनी ट्विटवर व्यक्त केल्या. कोरोनाचे संकट गंभीर आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी कसोशीने पालन करावे, अशा शब्दांत त्यांनी बेजबाबदारीचे प्रदर्शन करणारांचे कान उपटले.

आपली प्रतिक्रिया द्या