हमाल विमान घेऊन उडाला, 1 तास उडवलं विमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानतळावर प्रवाशांचे सामान लोड-अनलोड करणारा एक हमाल विमानतळावरून थेट विमानच उडवून घेऊन पळून गेल्याची घटना अमेरिकेत समोर आली होती. या व्यक्तीने विमान उडवल्यानंतर तो एअर कंट्रोलरला विचारात होता की जर त्याने विमान सुरक्षित लँड केले तर त्याला पायलट बनवले जाईल का? अमेरिकेतील सिएटल टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. एका हमालाने विमानतळावरून विमान चोरून ते क्रॅश केले होते. 10 ऑगस्ट 2018 रोजी होरायझन एअरचे बॉम्बार्डियर Q400 विमान या हमालाने उडवले होते.

नवीन व्हिडिओमध्ये या हमालाने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या टी-शर्टवर द स्काय हॅज नो लिमिट असे लिहिले होते. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, रसेल हा हमाल विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रवेश करतो आणि विमान सुरु करून त्याचे टेक ऑफ करतो. यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलने त्याच्याशी संपर्क साधून त्याला सुरक्षित लँडिंगसाठी विनंती केली. मात्र तो म्हणाला की ‘मी सध्या हवेत आहे. जर मी विमान सुरक्षित लँडिंग केले तर मला पायलटची नोकरी मिळेल का?’ यावर एटीसीने त्याची समजूत काढली, तसेच त्याच्या या कृत्यासाठी तो आयुष्यभर तुरुंगात जाऊ शकतो असेही सांगितले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.

अखेर 1 तास 13 मिनिटे हवेत विमान उडवल्यानंतर रसेलने एका बेटावर हे विमान क्रॅश केले. या अपघातात रसेलचा मृत्यू झाला. नंतर या प्रकरणाची एफबीआयकडूनही चौकशी करण्यात आली. त्यानंतर एफबीआयने या घटनेचा कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी घटनेशी संबंध नई असे म्हटले होते.