चाईल्ड पॉर्न मोबाईलमध्ये असणे गुन्हा नाही; केरळ हायकोर्टाचा निर्वाळा

चाईल्ड पॉर्न मोबाईलमध्ये असणे हा गुन्हा नाही. मोबाईलमधील पॉर्न व्हिडीओ इतरांना देण्यासाठी डाऊनलोड केला असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यास तो गुन्हा ठरतो, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

27 वर्षीय सेबीन थॉमसने दोषमुक्तीसाठी अपील याचिका केली होती. चाईल्ड पॉर्न पसरवण्याच्या हेतूने डाऊनलोड केल्याचा आरोप सेबीनवर होता. पोक्सोसह आयटी कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. न्या. ए. बधरुद्दीन यांच्या एकल पीठाने सेबीनची दोषमुक्तीची मागणी मान्य केली. सेबीनविरोधात खटला चालवता येण्यासारखे पुरावे सरकारी पक्षाकडे नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण
गेल्या वर्षी 26 फेब्रुवारी सेबीनने मोबाईलमध्ये चाईल्ड पॉर्न डाऊनलोड केला. डाऊनलोड केलेला पॉर्न अन्य कोणाला दाखवणे व पाठवणे हा गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. यांपैकी कोणतेही कृत्य मी केलेले नाही. तसा पुरावा पोलिसांकडे नाही. माझ्या मोबाईलमधील पॉर्न मी अन्य कोणालाही पाठवला नसल्याचा केमिकल अनलायझरचा अहवाल आहे. या आधारावर दोषमुक्तीसाठी विशेष जलदगती न्यायालयात अर्ज केला होता. विशेष जलदगती न्यायालयाने सेबीनचा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात सेबीनने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सेबीनच्या याचिकेला पोलिसांनी विरोध केला होता. सेबीनचे म्हणणे न्यायालयाने ग्राह्य धरले.