ध्यानासाठी  श्रीराम धून!

>>प्रगती करंबेळकर

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी आहे. रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच गायक, कलावंत मंडळीही कलेच्या माध्यमातून श्रीरामाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करताना दिसत आहेत. प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल यांनी श्रीराम धून सादर केली आहे. अल्पावधीत श्रीराम धून लोकप्रिय झाली आहे.

श्रीराम धूनविषयी नेहा राजपाल म्हणाल्या, ‘‘मी डॉक्टर असले तरी अध्यात्मावर माझा विश्वास आहे. मी लहानपणापासूनच आध्यात्मिक आहे. देवाच्या धून गाऊन त्या प्रदर्शित कराव्यात अशी माझी इच्छा होती. त्यास अयोध्येत होणाऱया श्रीराम मंदिर  प्रतिष्ठापनेचे निमित्त झाले.’’

नेहा यांनी शिवा धून, गणपती धून अशा अनेक धून सादर केल्या आहेत. त्यांच्या मते या धून व्यक्तीचे ध्यान एकनिष्ठ करण्यास मदत करू शकतात. संगीताचा ध्यानावर चांगला प्रभाव पडतो. संगीताचा भावना आणि शरीर या दोन्हींवर खोल परिणाम होतो. वेगवान संगीत तुम्हाला अधिक सतर्क आणि एकाग्रतेची जाणीव करून देऊ शकते. उत्साही संगीत तुम्हाला जीवनाबद्दल अधिक आशावादी आणि सकारात्मक वाटू शकते. एक मंद गती तुमचे मन शांत करू शकते आणि तुमचे स्नायू शिथिल करू शकते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभराचा ताण सोडवताना शांत वाटते. विश्रांती आणि तणाव व्यवस्थापनासाठी संगीत प्रभावी आहे.

नेहा यांनी देवांच्या धून गाऊन प्रदर्शित केल्या. राम मंदिराच्या निमित्ताने सगळय़ाच देवांचे गुणगान गावे असे त्यांचे म्हणणे आहे. या धून जेव्हा  इन्स्टाग्राम स्टोरीज आणि रील्समध्ये दिसतील आणि या धून जेव्हा लोक ध्यानासाठी वापरतील तेव्हा आपल्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटेल, असे त्यांनी सांगितले.

नेहा राजपाल या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगू, गुजराती, सिंधी, कन्नड अशा इतर हिंदुस्थानी भाषांमध्ये गायन केले आहे. नेहांच्या मते मराठी भाषा जर शुद्ध येत असेल तर इतर भाषा शिकण्यास जास्त अडचण येत नाहीत. त्यांचे वडील पंजाबी आणि आई मराठी असल्यामुळे त्यांना एकापेक्षा जास्त भाषा लहानपणापासूनच येत होत्या. त्यांच्या मते गायनामध्ये जर त्या गाण्याचा सार आणि भाव  कळल्यास भाषेचा अडथळा दूर होतो. कारण कुठलीही भाषा असो बारा स्वर हे प्रत्येक भाषेत तसेच असतात.