
सामना ऑनलाईन । मुंबई
कामाच्या ताणामुळे प्रत्येकजण त्रासलेला असतो. पण प्राणायाम केल्याने मन शांत होते. कामाचा ताणही बऱ्याच अंशी कमी होतो. दिवसभर धावणाऱ्या मनाला शांत करण्याची ताकद शीतली प्राणायामात असते. पण हा प्राणायाम योग्य प्रकारे करायला हवा.
सर्वप्रथम एखाद्या मोकळ्या जागेवर चटई अंथरून त्यावर आरामात बसायचे. मग जिभ बाहेर काढून एखाद्या नळीसारखी बनवायची. त्या नळीद्वारे श्वास आत खेचून घ्या. पोट भरेल एवढी हवा आत घ्या. त्यानंतर जीभ आत घेऊन तोंड बंद करून घ्या. त्यानंतर मान पुढे झुकवून आपल्या जबडय़ाचा पुढचा भाग छातीला लावण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ श्वास रोखून ठेवा. मग हळूहळू नाकाद्वारे श्वास बाहेर काढा. ही पूर्ण प्रक्रिया ३ ते ५ वेळा करा. १० मिनिटांतच तुम्हाला ताजेतवाने वाटायला लागेल. हाय ब्लडप्रेशर, शरीराचा थकवा, निद्रानाश आणि राग येण्याच्या समस्या हमखास दूर होतात.
निर्णय घेण्याची क्षमता
नियमित प्राणायाम केल्यामुळे विचार करण्याची, शिकून घेण्याची आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तरुण वयात प्राणायाम केला असेल तर पुढे वय खूप वाढले तरी ही क्षमता कायमच राहाते. म्हणूनच दररोज प्राणायाम केल्यामुळे २४ प्रकारचे धोके दूर करता येतात असा अहवाल इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. प्राणायाम केल्यामुळे शरीरात जास्त ऊर्जा तयार होते. विचारांमध्ये स्पष्टता येते. कठोरतेने प्राणायाम केला असेल तर हृदयाशी संबंधित बरेचसे आजार, इस्केमिक आणि हेमोरेजिक स्ट्रोक टाळता येऊ शकतात.

























































