
>> प्रसाद ताम्हणकर
क्लाउड स्टोरेज ही संकल्पना आणि या सेवेचा खरा फायदा लोकांना आता आता कळू लागला आहे. पूर्वीच्या काळी फ्लॉपी डिस्क अथवा सीडीवर हवा असलेला डाटा, महत्त्वाच्या फाइल्स, चित्रपट, गाणी हे आपण सेव्ह करत असू. हळूहळू मग यूएसबी पेन ड्राइव्ह, यूएसबीए हार्ड डिस्क यांनी त्यांची जागा घेतली आणि फ्लॉपीला तर जणू हद्दपार करून टाकले. आता क्लाउड स्टोरेज या दोघांची जागा बळकावत आहे आणि येणाऱया काळात त्याचा वापर जगभरात प्रचंड वाढलेला असेल हे नक्की.
क्लाउड स्टोरेज म्हणजे नक्की असते तरी काय? आपल्या मोबाइलवरची मेमरी आणि जागा वाचवण्यासाठी आपण अनेकदा आपले फोटो, व्हिडिओ हे गुगलच्या ‘गुगल फोटोज’मध्ये सेव्ह करतो आणि जेव्हा गरज भासते तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून ते आपल्याला मोबाइल अथवा संगणक अशा कोणत्याही डिव्हाईसवरती पुन्हा उपलब्ध होतात. गुगलच्या ड्राइव्हमध्ये आपण अनेक महत्त्वाच्या फाइल्स, डॉक्युमेंट्स, चित्रपट, गाणी सेव्ह करून ठेवलेली असतात. हे सर्व क्लाउड स्टोरेजचेच छोटे प्रकार आहेत. गुगलसारख्या कंपन्या एक ठरावीक क्षमतेचे स्टोरेज ग्राहकांना मोफत वापरासाठी उपलब्ध करून देतात. सरकारने आपली महत्त्वाची कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पदवी प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून जपून ठेवण्यासाठी डिजी लॉकर नावाची सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा क्लाउड स्टोरेजचा एक भाग आहे.
अर्थात हे झाले आपल्यासारख्या सामान्य वापरकर्त्यांचे, पण लघु उद्योग, मोठय़ा कंपन्या, बँका, अंतरराष्ट्रीय कंपन्या यांना प्रचंड मोठय़ा प्रमाणावर माहितीचा साठा सेव्ह करून ठेवायचा असतो. अशा वेळी त्यांना एक मोठय़ा क्षमतेच्या क्लाउड स्टोरेजची आवश्यकता भासते. अॅमेझॉन, मापोसॉफ्ट, गुगलसारख्या दिग्गज टेक कंपन्या अशा वेळी आपल्या प्रचंड मोठय़ा क्लाउड स्टोरेजमधील काही जागा या कंपन्यांना भाडय़ाने अथवा विकत उपलब्ध करून देतात. सध्या या क्लाउड सर्व्हिसच्या मार्केटमध्ये वार्षिक 500 अब्ज डॉलर्सची उलाढाल होते आहे आणि येत्या दहा वर्षांत त्यात आठ पट वाढ होईल असा अंदाज आहे.
इंटरनेटच्या वाढत्या प्रसारानंतर माहितीची, विविध मोठय़ा आकाराच्या फाइल्सची जसे की चित्रपट, गाणी, संगणकावरील प्रोग्राम्सचे सेटअप इ.ची देवाणघेवाण सुलभ झाली. हा सगळा डेटा संगणकावर साठवणे अवघड होऊ लागले. त्यानंतर मग संगणकाच्या बाहेर आपला हा डाटा सुरक्षित आणि हवा तेव्हा सहज उपलब्ध होऊ शकेल अशा सेवेचा शोध सुरू झाला आणि त्यातून मग काही कंपन्यांनी जिथे जमीन स्वस्तात उपलब्ध असेल अशा ठिकाणी ती खरेदी करून तिथे आपली प्रचंड मोठी अशी डाटा सर्व्हिस आणि स्टोरेज सेंटर उभारली. काही काळाने आपण उभी केलेली ही स्टोरेज सेंटर गरजेपेक्षा कितीतरी अधिक आहेत हे कंपन्यांच्या लक्षात येऊ लागले आणि त्यातूनच मग या उरलेल्या क्लाउड स्टोरेजच्या जागेला इतर कंपन्यांसाठी काही मोबदल्यात उपलब्ध करून देण्याची कल्पना आकाराला आली.
सर्वात प्रथम म्हणजे 2006 साली अॅमेझॉन कंपनीने अशी सेवा इतर कंपन्यांना उपलब्ध करून दिली. त्यानंतर इतर कंपन्यादेखील या क्षेत्रात उतरल्या. मात्र सध्या या व्यवसायात 75 टक्के इतका मोठा वाटा अॅमेझॉन, गुगल आणि मापोसॉफ्ट अशा फक्त तीन कंपन्यांचा आहे. सध्या अशा साठवलेल्या डाटाच्या सुरक्षेसाठी जगभरातील सर्व देशांचे स्वतचे असे कायदे आहेत आणि अशा सेवा देणाऱया कंपन्यांना त्याचे पालन करावे लागते. एका विशिष्ट प्रदेशातील अथवा देशातील लोकांचा साठवलेला डाटा, गुप्त माहिती ही इतर देशांतील लोकांच्या हाती लागण्याचा, हॅकर्सने ती पळवण्याचा आणि त्याचा गैरवापर होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. अशा अनेक घटना जगभरात घडल्या आहेत आणि घडतदेखील आहेत. त्यामुळे अशा साठवलेल्या डाटाची सुरक्षा हा मुद्दा जगभरात ऐरणीवर आलेला आहे.




























































