
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला असतांना सर्वच गणेश मूर्ती कारखान्यात मोठी लगबग सुरु असून मूर्तीकार गणेश चित्रांवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत. संगमेश्वर मधील प्रसादे बंधूची चित्र शाळा पर्यावरण पुरक मूर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध असून या चित्रशाळेला तब्बल 100 वर्ष पूर्ण झाली आहेत.
संगमेश्वर बाजारपेठेत प्रसादे कुटुंबाचा गणेशमुर्तीचा कारखाना आहे. 100 वर्ष या कारखान्याला पूर्ण झाली आहेत. या गणेशचित्रशाळेत सुबक मूर्ती बनवल्या जातातच. मात्र प्रसादे यांच्या पाच पिढ्या इथं गणेशमुर्ती घडवण्याचे काम करत आहेत. विठोबा प्रसादे यांनी ही गणेशचित्र शाळा सुरू केली होती. त्यानंतर आता प्रसादे कुटुंबातील त्यांची मुलं आणि पुतणे, पुतणी देखील हा वारसा पुढे चालवत आहेत.
अशोक प्रसादे यांच्यासोबत घरातील अनेक मंडळी गणपतीची मूर्ती घडवताना पहायला मिळतात. प्रसादे यांच्या घरातील पुतण्यानी सुद्धा या गणेशचित्र शाळेत रस घेतला. उच्च शिक्षण घेतलेल्या प्रसादे कुटुंबातील सदस्य सुद्धा मूर्ती घडविण्याचे तसेच रंगविण्याचे काम आवडीने करतात. महाविद्यालयीन शिक्षण घेणारी स्वरा प्रसादे तर गणपतीची रेखणी म्हणजे डोळे काढण्याचं अवघड काम लिलया करते. प्रसादे यांच्या कुटूंबातील बारा सदस्य माती मिळणे ते रंगकाम करणे अशी सर्व कामे स्वतः पार पाडतात. गणेशमूर्ती पूर्णपणे पर्यावरण पुरक असतात. शाडूच्या मातीच्या देखण्या आणि रेखीव गणेशमूर्ती प्रसादे यांच्या चित्रशाळेतून अनेक गणेशभक्त घेऊन जातात.
सध्या सर्वत्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पेण येथून आणून केवळ रंगकाम करीत भक्तगणांना दिल्या जातात. अशा स्थितीत प्रसादे हे एकही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विकत नाहीत. ज्या मूर्तींचे विसर्जना नंतर पाण्यात विघटन होत नाही अशा मूर्ती आम्ही कधीही तयार करणार नाही असा विश्वास कारखान्यातील कलाकार विश्वास प्रसादे यांनी व्यक्त केला.
































































