महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना पद्म सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, प्रगतीशील शेतकरी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) – राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱया आणि अंतिम टप्प्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आमि अन्य केंद्रीय मंत्री तसेच केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार तर अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी आणि कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.