राष्ट्रपतींनी स्वीकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा, ‘या’ कॅबिनेट मंत्र्यांना दिली अतिरिक्त जबाबदारी

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा विरोध करत हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्न प्रक्रियाउद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या राजीनाम्याचा स्वीकार केला आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी संविधानाच्या अनुच्छेद 75 च्या खंड (2) नुसार हा राजीनामा स्वीकारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर या मंत्रालयाचा कार्यभार राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपवला आहे. त्याच बरोबर नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे आधीचे खाते देखील कायम राहणार आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयके शेतकरी विरोधी आहेत असा थेट आरोप अकाली दलाने केला. यामुळे सरकारच्या शेतीधोरणाकरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अर्थात एनडीएमध्ये फूट पाडल्याचे चित्र आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कृषी सुधारणा संबंधी तीन विधेयके गुरूवारी लोकसभेत मांडली मात्र मंजूर होण्यापूर्वीच हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, तीन पैकी दोन विधेयके आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. यात शेती उत्पादन विक्री आणि हमीभाव अशा तरतुदी आहे. अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचा या विधेयकांना विरोध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या