
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पीडीपीसोबतची आघाडी ही भेसळवाला कार्यक्रम होता अशी पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत सांगितले की ‘ही आघाडी होण्यापूर्वीच आम्ही दोन्ही पक्ष हे दोन ध्रुवावरचे पक्ष आहेत’ असे म्हटले होते असं सांगितलं. हा एक प्रकारे भेसळवालाच कार्यक्रम होता असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये पीडीपीसोबतच्या आघाडीबाबत प्रश्न विचारला होता. ही आघाडी करून भाजपने चूक केली का असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की जम्मू कश्मीरमध्ये त्यावेळी सरकार स्थापन होण्याची परिस्थिती नव्हती, ज्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला होता.
“ज्यावेळी पीडीपीसोबत आघाडी झाली तेव्हा मुफ्ती मोहम्मद सईद हयात होते. ते अत्यंत वरिष्ठ नेता होते आणि समजूतदारही होते. सईद यांना विविध बाबी अत्यंत बारकाईने कळायच्या. आम्ही त्यावेळी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र सईद यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी आम्हाला मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत काम करावं लागलं होतं. “- नरेंद्र मोदी
पीडीपीसोबतची आघाडी तुटण्यामागचे कारण काय असा प्रश्न विचारला असता मोदी म्हणाले की ‘मेहबूबा यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. आमचे स्पष्ट मत होते की जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाव्यात. मेहबूबा यांचा याला विरोध होता. या निवडणुकांमुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार भडकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यांना या निवडणुका नको होत्या त्यामुळे त्यांनी याबाबत भीती निर्माण करण्याचं काम केलं या निवडणुकांमुळेच आम्ही आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला.’ काही दिवसांपूर्वी जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्या शांततेत पार पडल्या असं मोदी यांनी म्हटलं आहे. या निवडणुका झाल्यानंतर केंद्र सरकारचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळायला लागल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.



























































