पंतप्रधान मोदींचा करिष्मा संपत चालला! एनडीएतून बाहेर पडलेल्या खासदाराचा दावा

लोकसभेतील एनडीएचे एकमेव मुस्लिम खासदार, चौधरी मेहबूब अली कैसर यांनी काही दिवसांपूर्वी लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) सोडून राष्ट्रीय जनता दलात (आरजेडी) प्रवेश केला आहे. त्यांना खगरियामधून तिकीट नाकारण्यात आलं होतं. 2014 पासून त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एनडीएच्या राजवटीत द्वेष वाढीस लागला असून मोदींचा करिष्मा आता संपत चालला आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ सोबत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. एनडीएमध्ये असूनही गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मला मुस्लिम बांधवांचा प्रचंड पाठिंबा मिळाला होता. लोकसभेत एनडीएचा एकमेव मुस्लिम चेहरा असण्याचा मान मला मिळाला. खगरियामधून पुन्हा जिंकण्याचा मला विश्वास होता. खगरिया येथील जामा मशिदीच्या इमाम देखील यंदा मला पराभूत करू शकले नसते. पण आता मी RJD मध्ये प्रवेश केला आहे आणि INDIA आघाडीचा एक भाग आहे. मला सध्याच्या राजवटीत संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण करणारे मोठे प्रश्न हाताळायचे आहेत. प्रत्यक्षात आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत नाही मात्र अर्थव्यवस्थेबद्दल खूप चुकीची माहिती पसरवली जात आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या करिष्मा आणि आवाहनामुळे मी त्यांचा प्रशंसक होतो हे खरं आहे. पण त्याची लोकप्रियता कमी होत चालली आहे. त्यांच्या कारकिर्दीत हिंदू-मुस्लिम द्वेष अधिक वाढला आहे. मी गप्पा मारत नसून खगरियामधील माझ्या विजया मागे माझे कठोर परिश्रम आहेत. माझे कुटुंब देखील लोकांची कामे करण्यासाठी झिजले आहेत. माझे वडील चौधरी सलाहुद्दीन हे सिमरी बख्तियारपूरचे आठ वेळा आमदार आणि बिहारचे माजी मंत्री होते. माझे आजोबा नजीरुल हसन हे पूर्वीच्या सिमरी बख्तियारपूर (आता सहरसा अंतर्गत) संस्थानाचे नवाब होते. 2010 मध्ये (2013 पर्यंत) बिहार काँग्रेसचा अध्यक्ष होण्यापूर्वी मी देखील आमदार आणि बिहार मंत्री होतो, अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे बोलताना, राज्यातील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्याशी आपण सहमत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या निवडणुकांचे निकाल अनेकांना आश्चर्यचकित करतील. या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्या मंदिराच्या उद्घाटनाबाबत बरीच चर्चा झाली होती. हे काही काळ काम करत असल्याचे दिसत होते, परंतु आता त्याचीही फारशी चर्चा नाही. पंतप्रधान मोदींना त्यांच्या निवडणुकीच्या भाषणात लोकांना त्याची आणि प्रभू रामाची वारंवार आठवण करून देण्याची गरज होती. मतदानाच्या टक्केवारीतही घसरण झाली असून, यावरून लोकांमध्ये निवडणुकीबाबतचा उत्साह कमी आहे. काँग्रेसचा जाहीरनामा आणि मुस्लिमांबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचे मला आश्चर्य आणि निराशा होत आहे. अशी विधाने केवळ धार्मिक द्वंद्वाला धार देऊ शकतात, असंही ते यावेळी म्हणाले.