लॉटरी लागली! पृथ्वीकचे गृहस्वप्न साकार, दिवाळीच्या तोंडावर मिळाल्या म्हाडाच्या घराच्या चाव्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता पृथ्वीक प्रताप याचे ऐन दिवाळीच्या तोंडावर गृहस्वप्न साकार झाले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत पृथ्वीकला कलाकार कोटय़ातून गोरेगावमध्ये घर मिळाले असून नुकत्याच त्याला घराच्या चाव्या मिळाल्या आहेत.

पृथ्वीकने गुरुवारी सोशल मीडियावर घराचे काही फोटो शेअर करत म्हटलेय, आजवर अनेक स्वप्ने पाहिली. अनेक पूर्ण केली. अनेक स्वप्नं जगली आणि अनेक स्वप्नं भंगलीसुद्धा, पण एक स्वप्नं जे आजपर्यंत हुलकावणी देत होते ते पूर्णत्वाला आले. आयुष्याची 30 वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्पर हे आभाळापेक्षा कमी नसतं. आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना आनंदाने उर भरून आला आहे. पुढे तो म्हणाला,  घर छोटं आहे, पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरू राहणार आहे. कारण ‘पेंटहाऊस’ अभी बाकी है मेरे दोस्त…! गंमत म्हणजे आज 2 नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढदिवशी. त्यामुळे माझी ‘मन्नत’ पुरी झाली, असे म्हणायला हरकत नाही.