Video – अकोल्यात खासगी बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू, संतप्त जमावाने बस पेटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अकोला

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात एका भरधाव खासगी बसने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. अकोला-मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये आई- मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे.

अकोला येथून मंगरुळपीरकडे जात असताना भरधाव बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अनुराधा राठोड व नितीन राठोड या माय लेकांसह अस्मिता पवार या अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दगडपारवा गावातील संतप्त ग्रामस्थांनी बसची तोडफोड करत बस पेटवून दिली.

दरम्यान याची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाचे उग्र स्वरूप पाहता पोलिसांनी अकोल्याहून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावली असल्याने घटनास्थळी सध्या तणावाचे वातावरण आहे.