खासगी शिकवण्या सुरू ठेवल्यास कारवाई, महापालिका शिक्षण विभागाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मुंबई आणि परिसरात कडक निर्बंध लागू असताना दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लासेस आणि घरगुती शिकवण्या सुरू असल्याच्या तक्रारी मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडे आल्या असून या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

मुंबई आणि परिसरात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश मागील महिन्यात शिक्षण विभागाने जारी केले आहेत. मात्र काही खासगी क्लासवाल्यांनी आपल्या सोयीनुसार विद्यार्थ्यांना बोलावणे सुरू ठेवले असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईत, चेंबूर, शिवाजीनगर, मानखुर्द, घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात मोठया प्रमाणावर अजूनही घरगुती शिकवण्या सुरू असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. काही क्लासेस चालकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांच्या शिकवण्या बंद ठेवल्या असल्या तरी घरगुती शिकवण्या मात्र सुरू आहेत.

शाळा आणि शिक्षण संस्था या बंद ठेवण्यासाठी आणि यापूर्वीच आदेश दिलेले आहेत. मात्र घरगुती शिकवण्या जर कुठे सुरू असतील तर त्यांची माहिती घेऊन संबधित अधिकाऱयांकडून कारवाई केली जाईल, असे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.