
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला उद्यापासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी तेलुगू टायटन्स व यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स – पाटणा पायरेटस् या संघांमधील झुंज कबड्डीप्रेमींना पाहायला मिळेल. 20 जुलैपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत 12 संघ जेतेपदासाठी भिडणार असून 19 ऑक्टोबरला जेतेपदाचा फैसला होणार आहे.
पाटणाची जेतेपदाची हॅटट्रिक
प्रो कबड्डी स्पर्धेत सर्वाधिक यश संपादन केले आहे ते पाटणा पायरेटस् या संघाने. या संघाने सलग तीन जेतेपद (जानेवारी 2016, जून 2016, 2017) पटकावण्यात यश संपादन केले आहे. याखेरीज जयपूर पिंक पँथर्स, यू मुंबा व बंगळुरू बुल्स या संघांनी प्रत्येकी एक वेळा अजिंक्यपदावर मोहोर उमटवली आहे.
यू मुंबाचे यश
पहिल्या सहा पर्वावर नजर टाकल्यास यू मुंबा सरस संघ वाटत आहे. यू मुंबाने 107 सामन्यांमधून 68 सामन्यांत विजय मिळवले असून 63.55 इतकी यशाची टक्केवारी त्यांची आहे. तामीळ थलैवाजचा राहुल चौधरी सर्वाधिक एकूण 876 गुणांसह चढाईपटूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. पाटणा पायरेटस्चा परदीप नरवाल 858 गुणांसह चढाई गुणांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तामीळ थलैवाजचा मनजीत चिल्लर 302 टॅकल पॉइंटस्सह सर्वोत्तम बचावपटू ठरलाय.
यंदाच्या मोसमातील सहभागी संघ व कर्णधार
- अजय ठाकूर – तामीळ थलैवाज
- अबोझार एम. – तेलुगू टायटन्स
- फझल अत्राचली – यू मुंबा
- दीपक हूडा – जयपूर पिंक पँथर्स
- नीतेशकुमार – यूपी योद्धा
- जोगिंदर नरवाल – दबंग दिल्ली
- रोहितकुमार – बंगळुरू बुल्स
- सुरजीत सिंग – पुणेरी पलटण
- सुनीलकुमार – गुजरात जायंटस्
- परदीप नरवाल – पाटणा पायरेटस्
- धर्मराज चेरलाथन – हरयाणा स्टीलर्स
- मनींदर सिंग – बंगाल वॉरियर्स

























































