
सामना प्रतिनिधी । राहुरी
गाण्याचा आवाज कमी करा असे म्हटल्याचा राग आल्याने सलून मधील दोघा कारागिरांनी राहुरी कॉलेजच्या प्राध्यापकाला पट्ट्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरीत घडली आहे. या हाणामारीत प्राध्यापक निर्मळ यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे.
नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या सलूनमध्ये हाणामारीची ही घटना घडली. या प्रकरणी प्राध्यापक दिपक निर्मळ यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरून आज गुरूवारी अमोल कदम व मयुर कदम या दोघा विरूध्द जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राहुरीच्या कला,शास्र व वाणिज्य महाविद्याल्यात प्राध्यापक असलेले दिपक निर्मळ यांचे शहरात खाजगी क्लासेस सुरू आहेत. क्लासेसलगत असलेल्या सलूनमधील गाण्याचा आवाज मोठा असल्याने आवाज कमी करा असे निर्मळ यांनी दुकान चालकाला सांगितले.माञ हा राग अनावर झाल्याने अमोल कदम व मयुर कदम या दोघांनी निर्मळ यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत प्राध्यापक दिपक निर्मळ यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला आहे.































































