महागडे समजून परळ टर्मिनसच्या ई-टॉयलेटमध्ये कोणीच गेले नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रेल्वेमंत्र्यांनी 19 फेब्रुवारीला उद्घाटन केलेल्या परळ टर्मिनसवर अत्याधुनिक सुविधांची अगदी खैरात करण्यात आली. त्यात दोन-दोन सरकते जिने आणि लिफ्टची सोय करण्यात आली. या जोडीला परळ लोकल सुटणाऱ्या फलाटावर ‘डेड एण्ड’च्या बाजूला रेल्वेचे हायफाय ई-टॉयलेट उभारण्यात आले, मात्र चकाचक स्टीलचे टॉयलेट फारच महागडे समजून येथे कोणी फिरकलेच नाही. अखेर ‘एचपीसीएल’ने फंड दिल्यानंतर कालपरवा याचा वापर सुरू झाला आहे.

जुन्या परळच्या स्थानकात अरुंद जिना चढायला जेवढी गर्दीं असायची तेवढीच गर्दी ‘त्या’ जिन्याखालच्या बदबूदार टॉयलेटला असायची. नंतर रेल्वेने पराक्रमच करीत हे चिंचोळे टॉयलेटही ‘पे ऍण्ड युज’ करण्याचे धाडस दाखवले. त्यावरून रोजची खडाजंगी व्हायला लागली. पुढे पुलाखालून बरेच पाणी गेल्यावर नव्या परळ टर्मिनसची मुहूर्तमेढ रोवली. पण टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच दुर्दैवी चेंगराचेंगरी झाली. नव्या परळ टर्मिनसच्या उद्घाटनानंतर  22 मार्चपासून येथे ई-टॉयलेट ही संकल्पना प्रथमच वापरण्यात आली. या पहिल्याच ई-टॉयलेटमध्ये उद्घाटनानंतर कोणी जाण्यासच तयार नव्हते. काय असेल, कसे असेल याचा प्रवासी अंदाज घ्यायचे, पण पावले पुन्हा आपल्या जुन्याच टॉयलेटकडे वळायची. अत्यंत गर्दीचा असलेला हा परिसर, पण टॉयलेट ओस कसे पडले याचे कोडे ‘मरे’ला पडले. अखेर महिनाभर वाट पाहून मध्य रेल्वेने अखेर हे ई-टॉयलेट संपूर्ण मोफत असल्याची पाटी येथे लावली ती एचपीसीएलच्या सीएसआर फंडातून मेंटेनन्सचा निधी मिळाल्यानंतर. आता या टॉयलेटचा प्रवासी हळूहळू वापर करू लागले आहेत.

काय आहेत सुविधा

  • प्रवेश करताच ऑटोमेटिक फ्लश.
  • वापरानंतर पुन्हा लादीसह सर्वत्र फ्लश.
  • टॉयलेट रिकामे असल्यास ग्रीन सिग्नल.
  • संपूर्ण स्टेनलेस स्टीलची बांधणी.
  • पुरुष व स्त्रियांकरिता स्वतंत्र ब्लॉक.
  • संपूर्ण इलेक्ट्रॉनिक संचलन.