
विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासण्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने (वय 15) घरी शिकविण्यासाठी येणाऱ्या शिक्षिकेचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे.
त्याने प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून शिक्षिकेचे चित्रीकरण केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. या प्रकरणी मुलाविरूद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शिक्षिका मागील पाच वर्षांपासून संबंधित अल्पवयीन मुलाला इंग्रजीच्या शिकवणीसाठी त्याच्या घरी जात आहेत. काही दिवसांपूर्वी मुलाने प्रसाधनगृहात मोबाइल लपवून ठेवला होता.
शिक्षिका प्रसाधनगृहात जाण्यापूर्वी त्याने व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले होते. ही बाब शिक्षिकेच्या निदर्शनास आली. यापूर्वीही मुलाने चित्रीकरण केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मुलाविरूद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा, विनयभंग कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संगीता पाटील तपास करत आहेत.


























































