
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाले असून याच दिवशी जम्मूत आणखीन एक हल्ल्याचा कट दहशतवादी संघटनांकडून रचला जात होता. मात्र जम्मू पोलिसांनी हा कट उधळून लावत जम्मू बस स्टॅण्ड जवळून तब्बल 6 किलो स्फोटके हस्तगत केली आहेत. या कटात अल बद्र या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून यासाठी पाकिस्तानमधून देखील मदत केली गेल्याचे बोलले जात आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती जम्मू पोलिसांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरू केलेल्या शोधमोहिमेत पोलिसांनी सोहेल नामक एका संशयितास ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्या बॅगेतून एकूण 6 किलो आयईडी स्फोटके मिळाली असून सोहेल हा चंदिगड येथे शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानच्या अल बद्र या दहशतवादी संघटनेच्या सांगण्यावरून तो हिंदुस्थानात स्फोटके लावण्यास आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दोन दहशतवाद्यांना झाली होती अटक
जम्मू पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गेल्या काही आठवडय़ाभरापासून आपली शोध मोहिमेस सुरुवात केली. त्यानंतर गेल्याच आठवडय़ात पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. ज्यात 13 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी सांबा येथून द रेजिस्टेंट फ्रंटच्या जहूर अहमद याला तर 6 फेब्रुवारी पोलिसांनी लष्कर – ए – तोयबाच्या हियायतुल्ला मलिक उर्फ हसनैन याला जम्मू येथून ताब्यात घेतले होते.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेलला एकूण तीन ते चार ठिकाणांची माहिती देण्यात आली होती. त्यापैकी एका ठिकाणी त्याला ही स्फोटके लावण्यास सांगण्यात आले होते.
- काही दिवसांपूर्वीच सोहेल हा श्रीनगर गाठणार होता. तेथे अल बद्रचा सहकारी अख्तर शकील याच्या मदतीने तो कामास सुरुवात करणार होता.



























































