मोक्कातील फरार रविंद्र बर्‍हाटे याच्या मुलालाही अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शहरात जमीन व्यवहारात अनेकांना गंडा घालून फरार असलेला मोक्कातील आरोपी माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटे याच्या मुलाला गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली. मयूर रविंद्र बर्‍हाटे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. संबंधीत गुन्ह्यात कथीत पत्रकार देवेंद्र जैन, रविंद्र बर्‍हाटे याच्यासह 13 जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बर्‍हाटेच्या संपर्कात राहून कटात सहभागी झाल्याच्या कारणातून अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

गुन्हा दाखल झाल्यापासून रविंद्र बर्‍हाटे पोलिसांना गुंगारा देत आहे. गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत. मात्र अद्याप तो सापडलेला नाही. कटात सहभागी झाल्याच्या आरोपावरून यापुर्वी देखील काहींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी बऱ्हाटे याची पत्नी संगीताला पोलिसांनी अटक केली आहे.

तीन गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई

रवींद्र बऱ्हाटे टोळीप्रमुख असून त्याच्यासह एकूण 13 हून अधिक लोकांवर 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी हडपसर, कोथरुड, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बऱ्हाटे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून बऱ्हाटे फरारी आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई महसुल विभागाने केली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. बर्हाटे याच्याशी त्याची पत्नी संगीता संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना बुधवारी दुपारी ताब्यात घेऊन अटक केली