पुणे बाजार समितीवर शेतकरी विकास आघाडीचे वर्चस्व, शेतकरी विकास आघाडीला 13 जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांनी सर्वपक्षीयांना घेत स्थापन केलेल्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने एकूण 18 जागांपैकी 13 जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर वर्चस्व मिळवले आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत मित्रपक्ष आण्णासाहेब मगर सहकार पॅनेल आणि सर्वपक्षीय आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने एकमेकांसमोर शड्डू ठोकला होता. राष्ट्रवादी पॅनेलचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी केले तर, सर्वपक्षीय पॅनलचे नेतृत्व जिल्हा बॅकेचे संचालक विकास दांगट, प्रकाश जगताप, दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे यांनी केले होते. राष्ट्रवादीने अधिकृत पॅनलची घोषणा केल्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर दागंट यांनी सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्व ताकद पणाला लावली. तसेच पक्षातून हकालपट्टी झाली, तरी मी राष्ट्रवादीचाच असल्याचा प्रचार दांगट यांनी केला होता. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात सहानभूती मिळाल्याने त्याचा परिणाम निकालात दिसून आला.

सेवा सहकारी संस्था गटात विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक 1032 मते घेत रोहिदास उंद्रे, नितीन दांगट 1019, माजी सभापती प्रकाश जगताप 939, माजी सभापती दिलीप काळभोर 805, प्रशांत काळभोर 880, माजी संचालक राजाराम कांचन 854, दत्तात्रय पायगुडे 830 हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले. इतर मागास प्रवर्गातील शशिकांत गायकवाड 860 मतांनी, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून लक्ष्मण केसकर 879 मतांनी, महिला राखीव मतदार संघातून मनीषा हरपळे 1 हजार 76 मतांनी तर सारिका हरगुडे 868 मतांनी निवडून आल्या आहेत.

ग्रामपंचायतमध्ये दोन्ही पॅनलला प्रत्येकी दोन जागा

ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे रामकृष्ण सातव ( वाघोली) 405 मतांनी तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी)256  मतांनी विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदार संघात सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे (चंदन नगर खराडी) हे 307 मतांनी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मधून शेतकरी विकास आघाडीचे रवींद्र कंद (लोणीकंद) 375 मतांनी विजयी झाले.

हमाल मपाडी गटातून संतोष नांगरेंचा डॉ.आढाव यांना दे धक्का

हमाल मापाडी मतदार संघात कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे सर्वाधिक 888 मते घेत विजयाची शिट्टी वाजविली. नांगरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यांनी हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवार राजेंद्र चोरघे यांचा पराभव केला. त्यामुळे कामगार चळवळीत यापुढे राजकीय पक्षांचा डंका वाजणार असल्याचे स्पष्ट झाले. चोरघे यांना 403 तर त्या खालोखाल गोरख मेंगडे 314 मते मिळाली.

जय शारदा गजानन पॅनलचे विमान सुसाट, गणेश घुले, बापू भोसले यांचा दणदणीत विजय

व्यापारी – आडते मतदार संघातून जय शारदा गजानन पॅनलचे विमान सुसाट सुटले. पॅनलचे उमेदवार बाजार समितीचे माजी संचालक गणेश घुले 5 हजार 852 एवढी मते तर अनिरुद्ध भोसले 5 हजार 816 एवढी विक्रमी मतांनी विजयी झाले. या गटातील उमेदवार ज्येष्ठ आडते आणि माजी संचालक विलास भुजबळ (650 मते) अमोल घुले (374 मते) सौरभ कुंजीर (१ हजार 650 मते) शिवाजी सुर्यवंशी (१ हजार २७०) यांचा मानहाणीकारक पराभव झाला.

अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वपक्षीय उमेदवार निवडणुकीला सामोरे गेलो. सर्वांनी एक दिलाने निवडणूक लढवली, त्याचे रूपांतर विजयात झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती, हवेली तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्व उमेदवारांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतले जातील.
– विकास दांगट, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, पुणे.

सोसायटी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाल्यापासून विरोधकांनी बाजार समिती निवडणुकीची तयारी सुरू केली होती. आम्ही उशिरा तयारी सुरू केली. आम्ही सहकारातील नवखे कार्यकर्ते उभे केले होते. त्यामुळे हार पत्करावी लागली. त्यांना मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी.