
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात उच्चभ्रू सोसायटीत दिवसा घरफोडी करून तब्बल 30 लाखांचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी आणि युनीट एकने अटक केली. तसेच या आरोपीला दागिने लपविण्यासाठी मदत करणाऱ्या दोन साथीदारांनीही जेरबंद करण्यात आले. आरोपींकडून हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मुश्तफा शकील अन्सारी (रा. ग्रिनपार्क कोंढवा), जुनेद रिझवान सैफ (वय 29 रा. कोंढवा), आणि हैदर कल्लु शेख (वय 31 रा. पाखर सांगवी, बार्शी रोड, लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी बिबवेवाडीतील सोबा सवेरा अपार्टमेंटमध्ये 20 जूनला दिवसा घरफोडी करून दीड लाखांची रोकड आणि 60 तोळ्यांचे दागिने चोरून नेले होते. या चोरट्यांनी गॅलरीचे लोखंडी ग्रील वाकवून घरात प्रवेश करून ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून फिंगरप्रिंट विभागाची मदत घेतली. त्यावेळी सराईत मुश्तफा याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी दागिने लपवण्यासाठी आरोपीने दोन साथीदारांची मदत घेतल्याचे उघडकीस आले.
तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी दागिने लपविणाऱ्या दोघांना कोंढवा आणि लातूरमधून ताब्यात घेतले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुश्ताकला युनीट एकने अटक केली. त्याचा ताबा घेतल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी चोरीतील 60 तोळ्यांचे दागिने जप्त केले. ही कामगिरी उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, एपीआय प्रविण काळुखे, संतोष जाधव, सतिश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी येवले, तानाजी सागर, राहुल शेलार यांनी केली.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुश्ताक सराईत गुन्हेगार असून 2019 मध्ये तो कारागृहाबाहेर आला होता. तेव्हापासून तो पुन्हा घरफोडी करू लागला होता. दरम्यान, युनीट एकने त्याला कोंढव्यातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पथकाने त्याला बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने केली.































































