
मद्यधुंद मोटार चालकाने भरधाव वेगात कार चालवून पदपथावरून चाललेल्या एकाच कुटुंबातील तिघांना जोराची धडक दिली. या अपघातात सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास चंदननगर परिसरात घडला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मोटार चालक जोविमसन जेम्स (वय – 30) त्याला अटक केली आहे. अंकुर खंडेलवाल (वय – 38, रा. चंदननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अंकुर खंडेलवाल पत्नी आणि मुलासह नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खंडेलवाल दांपत्य पदपथावरून घरी जात होते. त्यावेळी मद्यधुंद जोविमसन याने गाडीने खंडेलवाल दाम्पत्याला जोरात धडक दिली. त्यानंत गाडी एका भिंतीला धडकली. ही धडक एवढी जोरात होती की सिमेंटची भिंत जमीनदोस्त झाली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंकुर खंडेलवाल यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक जोविमसन जेम्स याला अटकही केली. मद्यधुंद अवस्थेत तो मोटार चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता काही तासात त्याला जामीन मिळाला.
दरम्यान, मयत अंकुर खंडेलवाल 38 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या मृत्यूने खंडेलवाल कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

































































