
दारूचे व्यसन भागविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून दुचाकींची चोरी करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केले. त्याच्याकडून सव्वा लाख रूपये किंमतीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मिलिंद मधुकर शिंदे (वय 30, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शहरात वाहनचोरीचे गुन्हे वाढत असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट एककडून हद्दीत गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी वाहनांची तपासणी करताना एकजण नानापेठेतून संशयितरित्या दुचाकी घेउन जात असल्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, प्रशांत गायकवाड आणि दत्ता सोनावणे यांना दिसून आले. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मागदर्शनाखाली संशयित मिलींद शिंदे याला पथकाने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
सखोल तपास केल्यानंतर त्याने कोथरूड, समर्थ, दिघी पोलिस ठाण्याच्या हददीतून 5 दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याला पुढील कारवाईसाठी समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, दत्ता सोनावणे, प्रशांत गायकवाड, अशोक माने, विजुसिंग वसावे, शशिकांत दरेकर, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.































































